Monday, October 02, 2017

Another Legendary Internet Company

एक होता माणूस. अमेरिकेतल्या वॅलीमध्ये राहायचा. इंटरनेटचं खूळ नवं होतं तेव्हाची गोष्ट आहे ही. या तंत्रज्ञानातून काहीतरी उलथापालथ घडू शकते असं ज्यांना ज्यांना वाटलं त्या सगळ्यांनाच त्यातून भरामसाठ कमवता नाही आलं. पण ज्यांना जमलं त्यांनी एकूणच इंडस्ट्रीचा रावरंगच बदलला हे खरं. या माणसालाही तसंच वाटलं. काही गोष्टी ज्या दुकानातून लोकं विकत घेतात, त्या इंटरनेटवरून लोकांकडे पोचवू शकतो आशा त्याच्या कल्पनेमुळं. लोकांना काय आवडतं आणि किती आवडतं याचा त्याला अंदाज होता. त्यानं जेव्हा हा प्रकार सुरू केला तेव्हा हे नवीन होतं. इंटरनेट हे माध्यम असं होतं की ज्यांना झेपलं ते तगले. आम्हीच शहाणे म्हणून जे अडून बसले, ते काळाच्या पडद्या आड गेले. या माणसाला ते कळत चाललेलं. आणि त्या वेगानं पावलं उचलणं पण याने सुरू केलेलं. गोष्टी थेट इंटरनेट वरून लोकांपर्यंत पोचणार असल्यानं मिडल मॅन लोकांची वाट लागली. मोठमोठी दुकानं आता बंद पडणार होती. त्यांनी आवाज करायचा प्रयत्न केला पण याचं अलिखित उत्तर ठरलेलं होतं. माझ्या बरोबर या, तुम्हाला नवी पद्धत सांगतो धंदा करायची नाहीतर ऑल द बेस्ट आहेच. मिडल मॅन च नाही, पण मूळ निर्मात्यांना सुद्धा त्यांची माल बनवण्याची, लोकांपर्यंत पोचवण्याची पद्धत बदलणं भाग होतं. विक्रीसाठी पूर्वी इतकी मोठी साखळी नसल्यानं आता किमती कमी हवेत आणि त्याची सवय पाहिजे हे कळायला ज्यांना वेळ लागला त्यांची वाट लागली. लोकांच्या सवयी बदलल्या. इन्स्टंट गोष्टी मिळू लागल्या. आता मोठेच नाही तर छोटेही कुठून काय कसं मिळवायचं हे समजू लागले. हातात फोन आल्यावर, थ्री जी, फोर जी आल्यावर चित्रच पालटलं. अमेरिकेतल्या वॅली मधली कंपनी आता आफ्रिकेतल्या किंवा भारतातल्या गावापर्यंतच्या आबालवृद्धांपर्यंत पोचली होती. मध्यंतरी कोणीतरी अकडेवारीमध्ये कितीतरी बिलिअन लोकांपर्यंत हे दर दिवशी पोचतात असं ही या माणसांनं सांगितलेलं. आणि हे असेलही खरं. हे सगळं करता करता हा माणूस माप श्रीमंत झाला हे सांगायला नकोच. मग त्याला कोणी कोर्टात खेचलं. कोणी म्हणाले टॅक्स भरला नाही. कोणी म्हणाले तुमच्यामुळे मालाची पायरसी होतेय. कोणी म्हणालं अमक्याचा जीव गेला, कोणी म्हणालं तरुण पिढीला भलत्याच सवयी लागतायत. पैशा मागं धावताना आपण नैतिकता विसारतोय या इतक्या टोकालाही काहीजण गेले. पण या सगळ्या गलक्याचा आवाज मोठा झालाच नाही. कारण या माणसाने तयार केलेल्या प्लॅटफॉर्मवर येणारे लोक वाढतच जात होते. कोणी बाहेर येऊन बोलो न बोलो. लोकांच्यात इतकी प्रसिद्धी मिळत गेली की मालपण बदलत गेला. पूर्वी एक प्रकार असायचा, आता लोकं सांगतील तसले प्रकार बनू लागले. खपू लागले. लोकांच्या आवडीनुसार शंभर प्रकार एव्हाना बनले होतेच. ही इंडस्ट्री इतकी मोठी होईल याची कल्पना कोणालाच नव्हती. या माणसाने आपलंही प्रोडक्शन सुरू केलं. त्याची टेक्निकल टीमही जोरात आहे. डेटा सायन्स वापरून लोकांची आवड निवड ओळखून दररोज नव्या गोष्टी समोर आणण्याचं जणू ध्येयच घेतलंय याने. आणि हा डेटा पण काही साधासुधा किंवा कमी नाहीच. प्रचंड प्रमाणात.

आता पाच मिनिटं विचार करा आणि ओळखा बघू की हे कशाबद्दल आहे?

गेल्या २५ एक वर्षात कॉम्प्युटरशी निगडीत किंवा इंटरनेटशी निगडीत बऱ्याच कंपन्या निघाल्या. बऱ्याच अशा कंपन्यांना आपण उघड पणे डोक्यावर घेतलं. त्यांच्याकडं काम करण्यात चढाओढ केली. पण हे सगळ्यांच्या नशिबी कुठं? सध्या नुकतच एक पुस्तक संपवलं - बटरफ्लाय इफेक्ट नावाचं. पॉर्नहब आणि युपॉर्न नावाच्या साईट्स चालवणाऱ्या माणसाची गोष्ट आहे त्यात.

त्यानं सुरू केलेल्या या साईट्स मुळं कुठं कसा आणि कोणावर परिणाम होत गेला त्याची गोष्ट.

Did you think about this possibility while reading the first part?

No comments: