Monday, November 21, 2016

"एक्सेल" इन द करिअर

साधुवाणी, अध्याय सातवा
मी कोण आहे, माझ्या जगण्याचा काय अर्थ आहे, हा इथं प्रश्नच नसतो
कारण इथला प्रत्येक जण कोणा ना कोणाच्यातरी एक्सेल शीट मधला एक सेल असतो
तो एक चौकोन म्हणजे ज्याला त्याला बहाल केलेली त्याची जागिर
आणि किती एक्सेल शीट मध्ये आपल्या जागिरी त्यावर आपला भाव ठरतो

आपण कोणाच्यातरी एक्सेल शीट मध्ये नांदतो
हे काळण्याला आपण इथं वयात येणं असं म्हणतो
ज्याला हे कळत नाही तो ज्युनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर किंवा असोसिएट मेम्बर ऑफ स्टाफच राहतो

एका सेल पासून ते अख्खा रो आपल्या नावाचा बनणं
म्हणजे पुढचा टप्पा असतो
या टप्प्यात कोणीही येऊन आपल्या नावावर बिलं फाडून जातो
आणि आपणही हळूच कोणावर तरी हात साफ करून घेतो
अंगावर पडलेल्या वाढीव जबाबदाऱ्या
मिळालेल्या, मिळवलेल्या की लादलेल्या असल्या प्रश्नांना आपण बगल द्यायला लागतो!

जो याच्यापुढे तगतो त्याला आख्खीच्या आख्खी एक शीट आपल्या नावावर करायची संधी मिळते!
आपल्यावर फडलेल्या बिलांना त्या शीटमधल्या कुठल्याही रो मध्ये घुसवायची मुभा मग असते
आपापल्या शिटवर अकर्षक रित्या जेवढे रो आपण मांडू शकतो, तेवढी आपली रँक जास्ती असते
कोणी बॉर्डर काढतो, कोणी रंग भरतो, तर कोणी सबटोटलही मारतो
ज्या शीटवर जास्ती फॉर्म्युले, त्या शीटवाल्याचा तीळ भर जास्ती दरारा असतो.

आणि ज्याच्या शिटमधले जितके जास्ती आकडे, शीटच्या बाहेर वापरले, त्याचा तितका जास्ती पगार असतो.

एखादी शीट स्पेशलही असू शकते.
स्वतःचा एकही आकडा नसताना, अख्खी एका नजरेत मावायला झूम लेव्हल ८० टक्के करायला लावते
सबटोटलच नाही तर इथं वीलूकअप आणि सम-इफ पण असतात
आणि व्हॅल्यू ऍडिशन म्हणून वरती चार पाच फिल्टर आणि दोन तीन सॉर्टपण लावले जातात.
एखादा फॉर्म्युला गंडला, किंवा कुठे एरर आला तर यांची झोप उडते
आणि यांच्या शीट मध्ये एकाहून जास्ती करन्सीची चिन्हं आली की यांची लाईफ बनते!

यासागळ्यांवर एक गॉड फादर बसलेला असतो
त्याच्या नावाचीच डायरेक्ट फाईल बनते
त्याच्या आतमध्ये खूपशा शीट्स असतात
त्याच्यापर्यंत पोचलं की म्या ब्रह्म पाह्यलाचं फिलिंग येतं
आपण जसं प्रत्येक पानाच्या डोक्यावर । गुरुदेव दत्त। लिहतो
तसं या फाईलच्या प्रत्येक शीट मध्ये "अवर ऑर्ग इज फ्लॅट" असं मुबलक टाकलेलं असतं

या इथवर पोचायच्या आधीच बऱ्याचदा आपलं आयुष्य संपलेलं असतं
मग आपल्याला वडीलधारे म्हणवून उपदेश घेण्यासाठी नव्या बॅचला आपल्याकडं पोचवलं जातं
चौकोनात कसं राहायचं आणि चौकोनात कसं वाढायचं याचं ज्ञान ग्रोथ स्ट्रॅटेजीची घुट्टी म्हणून आपण त्यांना देऊ करायचं असतं.
शेवटी आपलं जे काय बनेल, जे काय घडेल, त्याला कंट्रोल एस मारून, सक्सेस स्टोरी म्हणूनच सेव करायचं असतं.

No comments: