Sunday, July 28, 2013

प्रगतीच्या मार्गावर

एकदा काय होतं, आपल्या मधला एक हुशार गरजू होतकरू तरुण रस्ता चुकतो. आणि तो जाऊन पोचतो अशा ठिकाणी जिथे मनुष्य गुहेमध्ये राहत असतो. हुशार तरुणाचे नाव असतं हुसेन शामराव रहेजा. हुशार खूप हुशार असल्यामुळे तो नोकरी करत असतो. विरंगुळ्यासाठी तो सांस बहू वाल्या मालिकांना addict झालेल्यांना नावे ठेवत असतो. घरी येऊन मग तो आपलं वेगळेपण जपण्यासाठी, आपल्या खोलीत जाऊन Big Bang Theory, Mad Men, आणि Gray's Anatomy सारख्या मालिका नियमित बघत असतो. Computer समोर बसला म्हणजे काहीतरी कामच करत असेल असे मानून घरचेपण त्याला हुशार हुशार म्हणत असतात. एके दिवशी तो ऑफिसमध्ये खरेखुरे काम करतो आणि मग थकून जातो. बिचारा मग पडल्या पडल्या लगेचच झोपतो. हुशार सकाळी पक्ष्यांचा किलबिलाटाने दचकतो. पक्ष्यांचे आवाज हुशार ने फक्त Age of Empires आणि Dota मधेच ऐकलेले असतात. आपण या अशा ठिकाणी कसे काय आलो हे त्याला काळात नाही. अदल्या दिवशी office चा cab चा driver जरा पिलेला होता असा संशय आला होता. इतकंच त्याला आठवत असतं. सकाळी सकाळी या गुहेच्या दारात आपण कसे काय उठलो याचं कोडं काही त्याला उलगडत नाही! आता ऑफिसमध्ये जाऊन HR कडे तक्रार करायची आणि मगच त्या ड्रायवरला धडा मिळेल, असं ठरवतो आणि त्याला जरा बरं वाटतं. हुशार तसा लहानपणापासूनच समाज सुधारक वृत्तीचा असतो. लहानपणी तो शाळेतल्या शिपायाची तक्रार करत असतो.

थोडा वेळ इकडे तिकडे भटकल्यावर हुशारला आपण onsite आल्या सारखं वाटू लागतं. पडेल ते काम करायचं आणि adjust व्हायचं त्याला शाळा कॉलेजपासून ट्रेनिंग मिळालं असल्यानं त्याला आपण onsite जाण्याच्या अगदीच लायक आहोत असं खूप आधीपासूनच वाटत असतं. Onsite जाऊन camera विकत घेण्याचं त्याचं स्वप्न असतं. Long Term Onsite असणार असेल तर Macbook घ्यायचं पण स्वप्न असतं. हुशार लगेच उठतो. आणि आजूबाजूला भटकायला निघतो. गुहेमध्ये ४-५ लोक कमरेला झावळ्या नेसून न्याहारी करत असतात. पण हुशार शाकाहारी असल्याने तो त्यांच्याकडे जात नाही. स्वतःच्या बलबुत्यावर गोष्टी शोधून काढाव्यात असं ठरवून हुशार चालायला लागतो. एवढी सगळी झाडं एकाच ठिकाणी बघून सुरुवातीला हुशार जरा बावचळून जातो. मधेच झाडावरून काहीतरी डोक्यावर पडल्यानं तो वैतागतो. "कुंड्यांमधलीच झाडं rocks" असं फेसबूकवर टाकायची इच्छा होते. पण त्यानं रोमिंग सुरु केलं नसल्याने त्याला काहीच करता येत नाही. थोडं फार भटकल्यावर त्याला कळतं की आजूबाजूच्या लोकांना खूप मुलभूत गोष्टीच माहिती नसतात! तब्बल ५ मिनिटं चालतो नी थकतो. ऑफिसच्या एका फ्लोरच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकाकडे चालायला हुशारला ५ मिनिटं लागत असतात. त्यानंतर कॉफी घेतली नाही तर तो पुढचे चालू शकत नसतो. इथे कुठेच कॉफी मिळायची शक्यता नसते. त्याला आजूबाजूला गुहाच गुहा दिसत असतात. एकही थेटर, कॉफी शॉप, किवा काहीच लागत नाही. हुशार परत मुळच्या गुहेपाशी येतो. आतमधल्या लोकांची न्याहारी झालेली असते. त्यातला एक तरुण बाहेर येतो. आणि हुशारला बघून विचारतो. "काही शोधताय का?"

Onsite असल्यानं हुशार त्याला इंग्रजीमध्ये विचारतो. "Who are you?"
तो म्हणतो, "मी पुराना"
"पुराना मतलब क्या?" Onsite असल्यानं हुशार आता आपल्या मराठी विचारांचं हिंदीमध्ये भाषांतर करून विचारतो.
"पुराना म्हणजे पुरुषोत्तम रामदेव नामधारी."
"तुझ्या कंपनीचं नाव काय?" हुशार शेवटी नाईलाजाने मराठीवर येतोच. जगातला प्रत्येक माणूस कुठल्याना कुठल्या तरी कंपनी मध्ये काम करतच असतो अशी हुशारची खूप गाढ समजूत असते. पुराना कुठल्याच कंपनीमध्ये काम करत नसतो. तो सकाळी उठून शिकारीसाठी बाहेर पडत असतो. त्याच्या कळपातल्या सगळ्यांबरोबर तो भटकत असतो. कळपातल्या सगळ्यांचेच नाव पुराना असतं. यांना काहीतरी वेगवेगळी usernames द्यावी लागतील हे हुशार मनाशीच लिहून ठेवतो. हे सगळे पुराने जे काही मिळेल ते सगळे एकत्र बसून खात असतात. उन पाउस वारा यापासून बचावासाठी निरनिराळी निवाऱ्याची साधनं बांधत असतात. कायम एकत्र राहत असतात. हे सगळं बघून हुशार मधला Entrepreneur जागा होतो. (Entrepreneur म्हणजे काय हे माहिती नसेल तर तुम्ही English Vinglish पहिलाच नाही राव!). तसा हुशार नोकरदार माणूस. त्याला हे असलं शोभत नाही हे हुशार ला माहिती असतं. पण आपल्याला आयुष्यात मोठं व्हायची हीच संधी आहे असे मानून तो विचार करायला लागतो.

आपण खूपच आदिमानवाच्या वस्तीमध्ये आलो आहोत हे त्याला कळलेले असतं. त्यांच्यामानानं आपण खूपच प्रगत. म्हणजे या सगळ्या पुरान्यानी न ऐकलेल्या किंवा न बघितलेल्या गोष्टी आपण यांना सांगू शकतो. आणि म्हणजे आपण देव बनून जाऊ यांच्यासाठी! देव नाही तरी कमीत कमी टाटा, बिर्ला किवा अंबानी यांच्या लेवलचे होऊच की, या विचारानं हुशार खूप खुश होतो. हुशारच बॉस त्याला कायम म्हणत असतो, You got to be at the right place at the right time, हुशारला त्याचा अर्थ आत्ता प्रथम कळालेला असतो. हुशारच्या मनामध्ये त्याने एक मोठं बिझनेस साम्राज्य उभं केलेलं असतं. त्याला "हुशार and sons" असं नाव पण लागलेलं असतं. आता परत जाऊन HR कडे resignation द्यायचं नी मग farewell ला काय स्पीच द्यायचं याच्या विचारामध्ये मग्न असतानाच पुराना त्याला विचारतो.

इतक्यात पुराना विचारतो, "तू काही खात नाहीस?"
"इथं सबवे नाहीये न. म्हणून नाही खाल्लं. onsite गेलोकी सुरुवातीच्या दिवसात फक्त सबवे मधेच खावं असं मला एकानं सांगितलेलं."
"तुला फळं, भाज्या, खायच्या असतील तर आपल्याकडे खूप आहेत. मगाशी एक ससा पण मारून आणलाय मी."
"नाही नाही! आमच्याकडे non-veg वगैरे खायचं असेल तर आम्ही फक्त अशाच ठिकाणी जातो जिथे ज्या प्राण्याला खायचं त्या प्राण्याचे खूप आनंदित वालं चित्र बाहेर लावलेलं असतं. जरा कमी गिल्ट येते त्यामुळं. पण तसंही मी आता शाकाहारी आहे. म्हणून सब वे."
"सब वे मध्ये काय असतं?"
"सांगेन. लवकरच सांगेन. पण सध्या माझा विचार वेगळाच आहे. तुम्हाला सगळ्यांना मी आता एकदम खूप सुधारावणार आहे. You are lucky to have me here! मी खुप प्रगत समाजातून आलोय. आता मी तुमचा समाजसुधारक होणार."
"आम्ही शिकार करू शकतो. हत्यार बनवू शकतो. स्वतःचे रक्षण करू शकतो. आम्ही खूप प्रगत जमात आहोत. आम्हाला आणखी काही सुधारावण्याची गरज नाही."
"अरे येड्या, आम्ही पण असेच म्हणतो आमच्याकडे. पण तुम्ही आमच्या लेवलला नाही आलेला अजून. आणि मी तुम्हाला मदत करेन." कस्टमरला मापात काढायचं ज्ञान हुशारला त्याच्या बॉस ने दिलेलं असतं. हुशार Dilbert वाचून त्यातूनही बोध घेत असतो. त्यामुळं पुरणाला मापात काढण्यात हुशारला काहीच गैर वाटत नाही.

"तुम्हाला मी प्रगत जमातीमध्ये गोष्टी कशा होतात ते सांगेन. मग तुमची पण प्रगती होईल."
"पण मला नकोये प्रगती. मी प्रगतच आहे."
 "पहिला धडा. आपल्याला नको असं काही नसतं. खास करून जर फुकट मिळत असलं तर नक्कीच ते आपल्याला हवं असतं. प्रगत समाजात असाच होतं. आधी आनंदी लोक शोधायचे. त्यांना सांगायचं की ते आनंदी नाहीयेत. कारण काहीही द्यायचं तुमच्याकडे हातरुमाल नाहीये किवा तुमच्या भिंतीचा रंग नीला नाहीये किवा तुम्ही सिनेमा वाल्या नायिका वापरते तो साबण वापरत नाहीये. असले काहीही कारण देऊन त्यांना सांगायचे की ते आनंदी नाहीयेत. मग त्यांना त्या त्या गोष्टी द्यायच्या. मग ते सगळे आनंदी होतात. हीच प्रगती. प्रगत झालास तर सही आयुष्य जगशील."
"मी आत्तापण सही आयुष्य जगतोय." पुराना आपला मुद्दा सोडताच नसतो.
"हे बघ. एक काम कर. प्रोजेक्ट प्लान बनवून आण आधी. मग बोलू आपण." हुशार ला आपल्या बॉसची खूप आठवण होत असते म्हणून तो नकळत तो बॉस सारखं असंबद्ध बोलायला लागलेला असतो.

पुरानाला कशाचा प्रोजेक्ट प्लान आणि काय याचा काहीही थांग पत्ता लागत नाही. तो तसाच त्याच्या गुहेमध्ये जातो. थोड्या वेळाने आणखी काही लोकांना घेऊन येतो. त्यांना सांगतो, "तुम्हाला म्हणालेलो न, भूतदया करावी. आता इकडे या. याच्याकडे बघा. नाही का तुम्हाला दया येत? मुके प्राणी पण असेच निरागस असतात. त्यांना सगळ्यांनाच लगेच मारायचे नसते. या इकडे. बसा याच्या समोर. तुम्हाला पण दया येईल. भूतदया शिकाल तुम्ही." पुरानाच्या असल्या पुरोगामी विचारामुळे लोक त्याचे विशेष ऐकत नसत. पण दुपारच्या जेवणानंतर करमणूक म्हणून ते बाहेर येऊन हुशारच्या समोर बसतात.

"अरे तुला प्रोजेक्ट प्लान आणायला सांगितलेला. तू प्रोजेक्ट टीम आणलास? Requirement च्या आधी recruitment? हे कसं कळलं तुला? तुला आणखी पण कोणी शिकवताय का?" आपण बिझनेस सुरु करण्याच्या आधीच आपल्याला competition आली की काय, या विचारानं हुशार थोडा वेळ घाबरतो. पण मग समोरचे कुतुहूल पूर्ण चेहरे बघून आपणच इथे शहाणे असे वाटून त्याला स्फुरण चढते. त्याच्या चेहऱ्यावरचे हे सगळे बदल बघून पुरानाच्या लोकांना हा माणूस खरच आता करमणूक करणार यावर विश्वास बसतो.

"हे बघा, तुम्हाला मी आता जे सांगणारे ते लक्ष देऊन ऐका."
लोक टाळ्या वाजवतात. पानात, झाडत सळसळ होते. पण हुशार ला एव्हाना असल्याची सवय झाली असल्याने, तो घाबरत नाही. पुढे सांगतो.
"आपण पैसा नावाचा प्रकार शोधून काढायचा. प्रगतीला गती मिळवण्यासाठी पैसा हवाच. मी बघतोय कधीपासून तुमच्याकडे पैसा वगैरे प्रकार नाहीचे. आपण तिथून सुरुवात करू. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आयुष्याला काहीतरी ध्येय प्राप्त होईल."
"कसलं ध्येय?"
"Good Question!" हुशारला परत आपल्या बॉस ची आठवण येते. तोही हुशार ला असच म्हणून एक बिस्कीट देत असतो. हुशारने आपल्या ड्रोवर मध्ये ती सगळी बिस्कीट मांडून ठेवलेली असतात. हुशार आत्तापण हात आजूबाजूला करतो बिस्कीट शोधण्यासाठी, पण हातात माती येते. हुशारला मातीची सवय नसल्याने तो हात झटकतो नी पुढे बोलू लागतो. "ध्येय कसले? हा आमच्या प्रगत जमान्यात पण प्रश्न पडतो लोकांना" हुशार ला थोडा वेळ आपले annual appraisal आठवते. पण तो तसाच पुढे बोलतो "ध्येय पैशाचे. आपण पैसा नावाचा प्रकार बनवायचा. आणि मग तो पैसा कमवायचे ध्येय ठेवायचे. म्हणजे तुम्ही सगळे सुखी होणार. तुमची प्रगती होणार."
समोरच्या लोकांना हे खूपच गमतीशीर वाटते. तरीही न राहवून त्यातला एक विचारतो.
"पैसा आपण बनवायचा. मग परत कमवायचा कशाला?"
"Again good question. आता हे शिकवणारे मी तुम्हाला. पण हळू हळू. तुम्ही खरच लकी आहात. की तुम्हाला मी मिळालोय.!"
गर्दीमधला एक जण पुरानाकडे खुण करून सांगतो की त्याला आत्ताच दया आलीये. बाकीचे लोक आता परत करमणूक होणार म्हणून उत्साहित होतात.
"आपण न मुठभर पैसे कमवायचे. आणि मग आपल्या गरजेच्या सगळ्या गोष्टीला पैसे देत बसायचे. म्हणजे खायचे पैसे. प्यायचे पैसे. हसायचे पैसे. रडायचे पैसे. लिहायचे पैसे. वाचायचे पैसे. राहायचे पैसे. शिकायचे पैसे. शिकवायचे पैसे. काही हवे असेल तर त्याचे पैसे. काही नको असेल तर त्याचे पैसे. असे अखंड पैसे देत घेत बसायचे."
गर्दीमधून पुरानाने एक शंका विचारली. "म्हणजे पैसे तयार करायचे नी वाटत बसायचे. मग शिकार कधी करायची?"
"बरोबर. तुमच्याकडे काही सध्या organized नाहीये. सगळ्यांना सगळे मिळते. ते बरोबर नाही. पैसे आले की मग प्रत्येकाची ऐपत ठरवायची. मग ज्याच्याकडे जास्ती पैसे त्याला जास्ती गोष्टी. ज्याच्याकडे कमी पैसे त्याला कमी गोष्टी. पण सगळ्यांनी अखंड पैसेच मिळवायचे. आणि मग ऐपत वाढवायची."
"अरे हुशार, मग हे सोपे नाही का? आपण सगळे जायचे. शिकार करायची. नी गुहेत येऊन खायचे?" 
हुशारला जरा प्रश्न समजायला वेळ लागतो. त्याला "हुशार and sons" च भवितव्य धोक्यात दिसायला लागतो.
"पैसा बनवायचा. मग कमवायचा. मग तुम्हाला हसत खेळत राहता येईल. हे असच असतं आमच्याकडे"

हुशारचे विचार पुराना लोकांसाठी खूपच करमणुकीचा विषय बनतात. त्यांच्या दररोज दुपारी गप्पा रंगू लागतात. झाडाखाली बसून हुशार त्यांना वेगवेगळ्या "प्रगत" गोष्टी सांगत असतो आणि झाडावर बसून बाकी सगळे त्याच्या गोष्टी ऐकत असतात. 

(क्रमशः)

No comments: