Saturday, November 17, 2007

प्रेमाचे आयसोटोप

कितीतरी गोष्टी समोर असतात बऱ्याचदा पण कधी बघण्याचा त्रास घेत नाही आपण. "आपण" कशाला म्हणू? म्हणजे ऊगाच स्वतः बद्दलचे शहाणपण जगाला चिकटवून सगळेच एक सारखे असल्याचे समधान. पण - मी - माझे - असे लिहीले तर परत वाचताना किती आत्म-केंद्रीत लिहीतो आपण असे वाटते! परत 'आपण'! असो. विषय वेगळाच आहे. तशी मधे ३-४ पोस्ट अशीच लिहून अर्धवट राहीलेली. गणेशोत्सव मधले 'कथा गदिमांच्या' असो किंवा 'मुलखावेगळी माणसं' असो किंवा 'रात चांद और गुलजार' कार्यक्रम असो. सगळे ड्राफ्ट मधेच राहीले. बऱ्याचदा एकदम जोशमे लिहीणे सुरू होते काहीतरी ... आणि पब्लीश करेपर्यंत नाहीच राहत. चालायचच.

तर प्रेम ... प्रेम विषय होता. तसे हेही सुरू करून महिना आरामात उलटला असेल - पण होय ... प्रेम हाच विषय होता ... किंवा तसा विषय काहीच नव्हता ... पण प्रेमापासून विषय सुरू झाले सगळे ... अपुर्ण ब्लॉगच्या कचऱ्यामधून ...

श्रृंगार रस बीभत्स नाही होणार याचे भान असलेले लोक म्हणून गदीमा, बाबूजी पेंढारकर आणि लावणी यांच्या बद्दल काहीतरी लिहायच्या विचारात होतो. सुरूवात चक्राला ती तिथून झाली. प्रेम प्रेम प्रेम ... सिनेमे ... पवसातली गाणी ... शाहरुखचे डायलॉग (तसे बॉलीवूडचे डायलॉग म्हणायचे होते ... पण तिकडे प्रेम या विषयावर शाहरूखची monopoly आहे ना .. म्हणून शाहरुख) ... या पलीकडे फार कमीवेळा गेलोय मी. मधे मधे प्रेम म्हणजे काय 'तसलेच' प्रेम कशाला हवेय म्हणून डीबेट वगैरे पण केलेली पण त्या नंतर परत प्रेम या शब्दाला ठरलेल्या चाकोरीच्या बाहेर काही नाही येवू दिले.

गेले दोन - चार दिवस मराठीमय दिवस होते ... मराठी नाटके ... सिनेमे बघणे कार्यक्रम सुरू होता. 'सातच्या आत घरात','श्रीमंत दामोदर पंत' आणि आज 'कार्टी काळजात घुसली'. सगळे एकदम वेगवेगळे विषय. सगळयांचा प्रेक्षकवर्ग वेगळा. पण कुठेतरी एक गोष्ट समान होती. प्रेम.

"असेल दामू थोडा वेडा... पण आमचे आयुष्य आता तोच आहे" असे म्हणणारा 'श्रीमंत दामोदर पंत' मधला दामूचा बाप ... किंवा "भडकलेले, चिडलेले कसेही पण बाबा तुम्ही मला खूप आवडलात." म्हणणारी ती 'कार्टी काळजात घुसली' मधली कार्टी! काहीतरी जुनेच पण नव्याने बघीतल्याचे जाणवले. काहीतरी हरवलेले परत मिळाल्यासारखे वाटले.

म्हणजे बघा ... एक मुलगी ... तब्बल १६ वर्षाने बापाला भेटते. बायको पोरीला टाकून गेलेला बाप - मोहन जोशी. त्याची त्याच्याएवढीच सडेतोड बोलणारी मुलगी. अगदी बापाच्या मैत्रीणीला "आत्या तुम्हाला म्हणता येणार नाही, आणि मावशी म्हणलेले मला चालणार नाही!" म्हणणारी! १६ वर्षानंतर फक्त बापने मायेने डोक्यावरून हात फिरवावा म्हणून आलेली ही मुलगी असो ... किंवा आपला वेडा दामूच आपले आयुष्य आहे मानणारे 'श्रीमंत दामोदर पंत' मधले आई वडील असोत. सारे बरेच काही बोलून जाते. प्रेमाच्या या छटा नवीन जरी नसल्या तरी ऊगाचच वेगळ्या वाटल्या खऱ्या.

एका भलत्याच संस्कृतीच्या कचाट्यात सापडल्याचा भास होतो हल्ली. आजूबाजूला बघावे तर एकदम Individualistic अशी अमेरीकन संस्कृती. स्वातंत्र्य अजीर्ण व्हावे अशी दृश्यं. आणि त्यात वावगं काहीच न वाटणारे लोक. मी पण कदाचीत. कारण स्वातंत्र्य ना! तुला नाही बरोबर वाटत, तर तू नको करू ना - ऊगाच बाकीच्याना काय सांगतो.

"प्रेम - प्रेम काय रे ... some times it works, sometimes it doesn't. If it does, it does. If it doesn't then wait a while, it will happen to you again"
असे म्हणणारे मीत्र आणि मग
"ईन्सान एक बार जीता है, एक बार मरता है। प्यारभी एकही बार करता है।"
म्हणणारा शाहरुख - एकमेकांशी वाद घालतात असे वाटू लागते.
किंवा अगदीच काही नाही तर - "साले ... तू कहा दुधका धुला है?" पण खरं बघावं तर विषय याही पलीकडचा आहे पण अलीकडच अडकून पडलाय.

कदाचीत म्हणूनच प्रेम ही कल्पना ठरावीक चाकोरीच्या बाहेर नाही जात. आयुष्याच्या आणाभाका देऊन प्रेमकथा संपत नाही ... तर सुरू होते. झाली तरी पाहीजे. आजूबाजूला बघावे तर पुढच्या पायरीपर्यंत कोणाला जायचेच नाहीए. कुठेतरी प्रेम लुप्त होताना दिसतेय. किंवा प्रेमाचा एकच आयसोटोप बाकी राहतोय आणि बाकी अंतर्धान पावतायत असे वाटतय. गेले सोळा वर्ष बाप असताना आम्ही पोरकी झालो म्हणताना रडणारी मुलगी आणि बापाने नकळत मायेने डोक्यावर हात ठेवल्यावर स्वर्ग मिळाल्यासारखे भाव दाखवणारी तीच मुलगी ... सोळा वर्षाने आपल्या मुलाशी फोनवार बोलणारा बाप ... सगळे चित्रच वेगळे. म्हणजे ती तगमग - ती अगतीकता - विरह - हर्ष - सर्व काही होते पण जसे काही वेगळ्याच कपड्यात. पण हे सगळे बघताना नवल का वाटावे ...? की या सगळ्या भावनांची ... सवय गेलेली? काहीतरी माझ्यामधेच मिसींग असल्यागत वाटतय. प्रेम हे फक्त ऊदाहरण आहे ... पण तशा कितीतरी गोष्टींमधे भलतीच सवय लागून गेलीये ...!

म्हणजे हे असेही असते. कदाचीत होतेच आधीपासून. पण बघतो कोण? त्यात स्पाईस नाही ना?! कदाचीत त्यामुळे. काय बघावे हे ही आपणच ठरवणार ... आणि काय नाही बघावे हे ही आपणच ठरवणार. प्रेमाबद्दलच बोलायचे तर ... ते ही प्रेम ... हे ही प्रेम. त्यात तुलना करणे योग्य नाही पण एकाकडे कानाडोळा आणि एकाकडे टकमक नजर! म्हणजे अगदी फक्त क्रिकेटचेच लाड आणि बाकी खेळांना सावत्र भावंडाप्रमाणे वागवल्यासारखे!

यातले काहीच नवे नव्हते. माहीत नव्हते असेही नव्हते. पण कदाचीत विसर पडला होता. किंवा नजरेला झापड लागलेली. रसायन शस्त्रामधे जसे पदार्थांच्या (की मूलद्रव्यांच्या ... आठले सर माफ करा, खरच शब्द आठवत नाहीए!) रुपाना आयसोटोप म्हणायचो तसे हे सारे प्रेमाचे आयसोटोप आहेत. काही नाहीसे होताना तर काहीना खास फुटेज खाताना. काहीना लुप्त होताना तर काहीना larger than life होताना. सगळे आपणच करतोय ... आपणस बघतोय. (परत 'आपण'! ...)

का कोणास ठाऊक ... नाटक बघून बरेच दिवस गेले ... पण हे विषय मनातून जात नाहीएत. कदाचीत कुठे तरी अनोळखी ठिकाणी चाललोय असे वाटतेय. आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमधे आपण सहभागी जरी होत नसलो तरो कुठेतरी त्यांचा अतीरेक आपल्याला त्या सगळ्या गोष्टींना ईम्युन बनवतो! या ईम्युनीटीची हल्ली भीती वाटतीये!! ही ईम्युनीटी आपल्यात ऊतरणार नाही ना - याची भीती! प्रेम हे खरच फक्त ऊदाहरण आहे ... अशा बऱ्याच गोष्टी आता नव्याने दिसतायत. थोडे मान ऊंचावून मागे वळून बघीतले तर कळेल.

म्हणजे अगदी ... तुम्ही ऊभ्या आयुष्यात दारूला स्पर्शही कलेला नसेल हो ... पण ईतका सर्वाना दारू पीताना पाहीला असाल ... की ऊद्या तुमचा मुलगा जरी प्यायला लागला तरी त्याचा कान धरायच्या आधी स्वतःच बरोबर करतोय की नाही याचा विचार कराल! प्रश्न बापलेकाचा नाही ... प्रश्न सवयीचा आहे. वावग्या गोष्टीमधे वावगे बघण्याचा आहे. एकदम अचुक शब्दात मांडता येत नाहीए ही अस्वस्थता ... पण ... काहीतरी घोटाळतेय मनात हे बाकी खरं.

अगदी असे नाही ... पण बरेचसे असेच विचार येवून गेले ... तसाही या ब्लॉगवर एकदम पहीला पोस्ट टाकला तोही बऱ्याच अनुत्तरीत प्रश्नाचा!! तिच श्रृंखला अजून सुरू आहे ... हे सारे नवीन प्रश्न ... एवढेच

मेरे मन ये बता दे तू ... किस ओर चला है तू!! क्या पाया नही तूने ... क्या ढुंढ रहा है तू!?

(मी असे काही नाटक बघीतले हे तसे कोणाला सांगून पटणार नाही - म्हणून ईतके सगळे लिहून काढले!)