Thursday, August 30, 2007

लौटके तू आयेगा रे शर्त लगाले!

लोक काय भन्नाट लिहीतात! जेव्हापासून 'चक दे' मधले गाणे ऐकले - 'मौला मेरे लेले मेरी जान ...' डोक्यातून जातच नाहीए! मागेही झालेले असे ... 'मै जहा रहू ..' ऐकलेले तेव्हा! नमस्ते अमेरीका म्हणायची फार लहर आलेली. पण खरच हेवा वाटतो या लोकांचा. कोणी ईतके सहज आणि कोणालही जवळ वाटेल असे कसे लिहू शकेल! गाणे ऐकताना काही नाही वाटत ... नंतर जो डोक्यात नाद सुरू होतो ... मजा त्यात येते.

बरेच दिवस ब्लॉगकडे वळायला वेळच मिळत नव्हता ... आज धुळ झटकावीच म्हणून बसलोय! कितीही नाही म्हणा... पण या काही गष्टींकडे मन वळतेच. :-) कदाचीत धुळ माझ्यावर बसलेली.

सॅन फ्रांसिस्को मधे परत येऊन तसे ८-९ दिवसच झाले असावेत ... पण ऊसंत नावाचा प्रकार नाहीए. मनात एक नविन ताजगी का काय म्हणतात ते आहे. कालच एका बीच वर जाऊन आलो ... रॉक अवे बीच. शेवटपर्यंत वाटत होते की रन-अवे बीच ... हे गोरे लोक ऊच्चारच असा विचित्र करतात ... की काय सांगावे. याला रन अवे का म्हणत असावे याचा बराच विचार केलेला ... पण शेवटी ते रॉक अवे नाव बघीतल्यावर जरा हिरमोड झाला. चालायचेच. कोणी कोणाचे काय नाव ठेवावे यावर कोण काय म्हणो...

बऱ्याच गोष्टी एकदम झाल्या. ईथे आल्यानंतर पहील्यांदा pacific ocean मधे पाय ठेवला ... परत एकदा मला समुद्राने आपल्या संमोहनात अडकवले ... परत एकदा तो अजस्त्र जलाशय काही बोलला मझ्याशी ... आणि परत एकदा तीव्र ईच्छा झाली काही लिहायची!

पाण्याशी खरच काहीतरी नाते आहे! की पाणी सगळ्यांशीच बोलतो की काय ... देव जाणे. पण काहीतरी वेगळेपण नक्की आहे त्यात. पाऊस म्हणा ... समुद्र म्हणा. हे ऊगाचच जवळचे वाटतात. आपसूकच. समुद्राच्या बाजूला एखादा कडा किंवा टेकडी असावी म्हणजे पर्वणीच. मागे bigsur ला गेलेलो तसे. ईथेही तसेच होते. मोठी च्या मोठी टेकडी समुद्राला लागून. असंख्य लाटा धडका मारताना खाली पायाशी आणि दिमाखात ऊभी ती टेकडी. त्याच्या एकदम टोकावर जाण्याची ईच्छा न व्हावी तर नवल!

कोणी बरोबर यायला तयार होईना ... पण या अशावेळी थांबतो कोण? अरे कुठे ती ऊंच टेकडी, ते पाणी आणि त्यासमोर ... "फार ऊंच आहे", "वेळ होइल", "वर काय असेल काय माहीत!", "ईथेच बरे वाटतय" ही कारणे! फारच तोकडी! या अशा काही वेळा खरच पुण्याची आठवण येते ... कोणत्याही क्षणी कुठेही यायला तयार असलेले मीत्र मैत्रीणी आठवतात. एका सकाळी वेड्यासारखे ऑफिसमधून निघून बावधानच्या मागे टेकडीवर गेलेलो. त्याही आधी NDA च्या ईथे पावसात टेकडी चढलेली! ईथे असे काही होणे म्हणजे स्वप्नवतच. पण असो. आई म्हणते ... काय 'आहे' ते बघा, ऊगाच 'नाही' त्यावर किती चर्चा! ईथे या अशा वेळी i-pod आपला सखा. घाला कानात डूल ... आणि व्हा सुरू. मनात तसूभरही नाही आले की पायात शूज नाही चप्पल आहे! पण आले जरी असते तरी फार काही बिघडले नसते. असे होते की जसे काही वर कोणीतरी बोलावत होते आणि जाणे अपरीहार्य आहे. नाही गेलो तर त्या टेकडीचा अपमान.

गाणे सुरू ...music वर पाय ही हलू लागले! केके नेही साथ दिली ... "तुमही तुम हो ... जो राहो मे, तुम ही तुम हो ... निगाहो मे" भन्नाट संगीत. याआधी हे गाणे ईतके आवडले नव्हते ... पण त्या वातावरणात मस्त जमून गेले ...! थोडे वर गेल्यावर कळाले की हा अजून शेवट नाही. अजूनही वरती आहे ... पावले आणि पढे सरसावली. केके बापडा गात होता ... "अब चाहे जो भी हो ... तुम हा या ना कहो!!" आणखी उंच ... आणखी ऊंच ...! ईतके की त्याच्या वरती काहीच असू नये. दरवेळी काहीतरी दिसायचेच ... शेवटी एका ठीकाणी पोचलो जिथून पलीकडे ऊतरण सुरू होणार होती. पलीकडचा दुसरा बीच पण दिसू लागला. खालून दिसत होते, त्याहून बरीच मोठी होती टेकडी. थोडावेळ थांबलो ... समोरच्या सगळ्या पाण्यच्या पसाऱयाकडे बघीतले. ऊगाचच वाटून गेले ... हे जे काही समोर दिसतय ... जिथेपर्यंत दिसतय. सगळे आपलेच आहे!

"केसरीया ... बालम ... आओ ... पधारो ... म्हारे देस ..." पुढचे गाणे! God Bless iPod. समोरच्या समुद्रातून येणारे सुसाट वारे सोडून आणखी कोणी येण्याचा काही चान्स नव्हता तरी ... come what may ... अगदी matrix मधल्या शेवटच्या मारामारीमधे neo ऊभारतो तसा त्या वाऱ्याला तोंड देत ऊगाच एकदम पराक्रमी वीराच्या आविर्भावात ऊभारलो. पण कोणी कशाला येईल? गाण्यात बिचारी बालम ला बोलावतेय आणि मी लढायला ऊभा. काही जमेना. क्षणात आमचा निओ पण समोर ट्रिनीटी दिसावी तसा पाघळला. बसला खाली! सुरेख गाणे! संपूच नये असे. मस्त जोर जोरात आवाज चढवून मीही साथ दिली! एक बाकी असते. एकटे असताना काय वाट्टेल ते करू हा वाला जोश पटकन येतो. तसा अमेरीकेत रस्त्यावर पण मोठ्याने गाणे म्हणालो असतो तरी काही बिघडले नसते म्हणा. तरी असो ... बाथरूमच्या बाहेर कुठेही गाणे म्हणणे म्हणजे थोडेसे धाडसच की!

वेळ कसा गेला कळालेच नाही! बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी झर्रकन डोळ्यासमोरून सरकल्या! अंतर्मुख होणे यालाच म्हणतात की काय माहीत नाही! पण बरे वाटले. धावपळ. अनिश्चितता. कुतुहल. चुका. अगाऊपणा. हाव. मत्सर. पाऊस. प्रेम. लोभ. माया. आणि या सगळ्यामधे असलेला मी आणि माझेच सगे सोयरे. आजू बाजूला तसे कोणीच नव्हते. पण त्या सगळ्यांच्या अस्तित्वाची जाणीव होत होती. वेळ तसाच आणखी मागे गेला. कॉलेज आठवले ... तिथल्या लोकांचा विश्वास आठवला. ऊगाचच वाटले ... ताडून तरी बघावे की मी अत्ता कुठे आहे आणि त्यानी मला कुठे पहीले होते. Newton बाबाने सांगीतलेय. आजूबाजूच्या सर्व गोष्टींचा force तुमच्यावर operate होत असतो. मधे हेच ऊदाहरण घेऊन मी कोणालातरी बोललेलो ... "तुझे आयुष्य केवळ तुझे नाहीए. आजू बाजूच्या सगळ्यांचे काहीतरी देणे लागतो आपण." पण या सगळ्या गावाला शहाणपणा शिकवण्याच्या नादात कधी स्वतःला तोलले नाव्हते. तसे सर्वांसारखी माझ्यापण आयुष्यावर बऱ्याच जणांची छाप आहे. मग त्याची परतफेड किंवा त्यांच्या अपेक्षांची परतफेड केली की नाही हेही बघीतलेच पाहीजे की! परतफेड म्हणता येणार नाही पण त्या दर्जापर्यंत तरी गेलो की नाही बघायला काय हरकत!?

ऊगाचच वाटले की या ज्या भावना, अगतीकता जे काही होते किंवा आहे ... ते सगळे आधी कुठे होते? ते आधी नव्हते तेव्हाचा 'मी' हा खरा 'मी' होतो की यांच्यासकट जो 'मी' बनलो तो खरा 'मी' आहे. गोची आहे राव! यात हे बाकीचे लोक कुठून आले. त्यांचा का म्हणून देणेकरी!? लोकाना सांगताना बरे असते - बस ग्यान बाटो. तसे आपण खरच शिकतोही आजूबाजूच्या लोकांकडून. चिकाटी ... जिद्द ... या गोष्टी मी माझ्या मित्रांच्यात फार प्रकर्षाने बघीतल्या. मग एके दिवशी त्याना follow करणे सुरू केले. मौज मजा आणि एकूणच येणाऱ्या घटनांकडे बघण्याचा दृष्टीकोन हाही कॉलेजमधेच अंगीकारला. एकूण काय गावभरच्या भरपूर गोष्टी आपल्यात आणायचा प्रयत्न. या सगळ्या लोकानी दरवेळी विश्वास दाखवलेला ... एकदम रंग दे बसंती मधल्या डायलॉग सारखा - "कुछ करके दिखायेगा डिज्जे!". पण ईथे डीज्जेने काय केले? बसलाय टेकडावर समूद्राचे ऐकत. पण मजा ईथे आहे. अजस्त्र समूद्र. विराट जलसमूह. आणि या सगळ्याने आलेला आत्मविश्वास. ईथे कोणीही शेर बनेल. कदाचीत म्हणूनच देवाने या अशा जागा ईतक्या ऊंचावर तयार केलेल्या असाव्यात. पण असो ... परत तोच जोश आला ... सगळे करू. सब कुछ. आहे काय त्यात. काय होईल... कसे होईल ... वगैरे विचार कधीच आले नव्हते आधी. मग आतातरी का यावेत? कदाचीत यामधे खरा 'मी' आहे. दररोजचे रुटीन होणारे दिवस. एकदम साच्यातून कढल्यासारखे. कोणी दुसऱ्याने दाखवलेली किंवा बघीतलेली स्वप्नं. त्यासाठी झटणारे तिसरे लोक ... आणि केवळ विचार करायला वेळ नाही म्हणून सर्वांमागे पळणारे आपण. स्वप्नं बदलतात. आवडी निवडी बदलतात. कशामागे धावतोय तेही त्याचाही काही वेळा विसर पडतो. मग कहीतरी माफक खुशी देणारी स्वप्न बघायची. तिच पुर्ण करायची. आपणच खुश व्हायचे. आणि मग असे कधीतरी पुर्वीचे दिवस आठवले की वाटते की काहीतरी खरच मागे सोडून अलो आपण. हे विचार एरवी येणे तसे शक्यच नाही ... जरी आले तरी "जाऊ दे ... निरर्थक आहे" म्हणुन पण सोडून देऊ. पण या अशा वेळी आले की एकदम भलतीच energy! आणि असे विचार अशा वेळीच यावे rather! कारण मग वाटते ...

"लौटके तू आयेगा रे ... शर्त लगा ले!"

खरं तर 'चक दे' बघायचे भाग्य अजून काही लाभलेले नाही. हे गाणेही बघायचा योग आला नाही. पण मला आपले असे दिसले हे गाणे. समुद्राच्या बाजूला ऊंच कड्यावर ऊभे राहून विजयी मुद्रेने (की आत्मविश्वासाने) समोर बघत रहावे जसे काही कोणी energy pump-in करतोय. सगळे साठवून घ्यावे. गाडीत पेट्रोल भरल्या सारखे. आणि माहित असावे ... कुठे जायचेय ते! rather कुठे यायचेय परतून ते.

गाणी सुरू होतीच ...

"मेरे मन ये बता दे तू ... किस ओर चला है तू ... क्या पाया नही तुने ... क्या ढूंड रहा है तू!"

अचानक कळाले ... की बघता बघता मी खाली येऊन पोचलोय. समोर लोक ओरडतायत की किती वेळ लावला म्हणून. पण who cares!

म्हणालो डीज्जेको पेट्रोल भरना था! ;-)
Post a Comment